धक्‍कादायक ! ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपुरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिण मृतावस्थेत आढळुन आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळुन आलेल्या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून तिची शिकार करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

हरणे मारण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक 123 या ठिकाणी फासे लावण्यात येतात. ते फासे आढळुन आल्याचे दिसत आहे. याच फाशात अडकल्याने वाघिणीचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपुर्वी वाघिणीचा मृत्यू झाल्याचे एका वन अधिकार्‍याने सांगितले आहे. शिकार करण्यात आलेल्या वाघिणीचे वय सुमारे दीड वर्ष होते.

वाघिण मृत अवस्थेत आढळल्याचे समजल्यानंतर क्षेत्रसंचालक प्रवीण एन.आर. आणि कोअर विभागाचे उप संचालक ना.सि. लडकत यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास महेश खोरे हे करीत आहेत. दरम्यान, ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.