महापालिका निवडणूकीपूर्वी औरंगाबादच नामांतर होईल, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  औरंगाबाद हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आहे. साहेबांनी म्हटले तसे आम्ही संभाजीनगर असे नामांतर करणारच. कोणीही किती विरोध केला तरी महापालिकेच्या निवडणूकीपूर्वी नामांतर होईल, असा दावा शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच संपूर्ण जनतेला संभाजीनगर नामांतर हवे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर खैरे आले होते. त्यावेळी खैरे बोलत होते. यावेळी खैरे म्हणाले की, 8 मे 1986 ला आम्ही सगळे निवडून आल्यानंतर औरंगाबादमध्ये विजयी मेळावा घेतला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी आपण संभाजीनगर असे नाव या शहराला देऊ असे जाहीर केले होते. तसेच आम्ही संभाजीनगरच म्हणणार असेही ते म्हणाले होते, असे खैरै म्हणाले. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. एकीकडे शिवसेनेने नामांतरासाठी ठाम भूमिका घेतली आहे तर काँगेसने नामांतरासाठी विरोध केला आहे.