मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे महानगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मनसेने देखील पुणे विभागात खांदेपालट केली आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर आज (बुधवार) त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची घोषणा राज ठाकरे यांनी केली. वसंत मोरे हे मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

2012 च्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी गटनेते म्हणून मोरे यांनी या गटाचे नेतृत्व केले होते. 2017 निवडणुकीत मनसेचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. आता महापालिका निवडणुकीला वर्ष राहिलेले असतानाच शहराची सूत्रे मोरे यांच्या हातात देण्यात आली आहेत.