पाथरीचे नामांतर ‘साई धाम’ असं करा, आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साईबाबा यांच्या जन्मभूमीचा वाद संपत असतानाच आता पाथरीचे नामांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे. साईबाबांचे जन्मभूमी असलेल्या पाथरीचे साई धाम असे नामांतर करावे अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे साईबाबा यांच्या जन्मभूमीचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरी गावचा विकास करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर वाद झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज झाले होते. तर शिर्डीतील नागरिकांनी बंद पुकारून याचा विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थिने हा वाद निवळला होता. मात्र जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नव्या मागणीमुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. मेघना बोर्डीकर या आपल्या मुद्दावर ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.

कागदोपत्री साईबाबा यांची जन्मभूमी ही पाथरी असल्याचे सिद्ध झालेच आहे. हे सर्वांना माहित होण्यासाठी पाथरीचे साई धाम असे नाकरण करावे अशी मागणी करणारे पत्र मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी त्या आग्रही आहेत. बोर्डीकर यांच्यासह आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगर परिषदेला नामांतरासाठी ठराव घेण्याचे सुचवले आहे. तर बोर्डीकर यांनी जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडोर सुरु करण्याची मागणी देखील केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –