मोबाईलप्रमाणेच आता वीजपुरवठ्याचाही करावा लागणार रिचार्ज ! ‘या’ तारखेपासून नियम लागू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आता वीजचोरी रोखण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. परंतु अनेकदा हे प्रयत्न फसले आहेत. परंतु आता ही वीजचोरी रोखण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय आणल्याचे दिसत आहे. प्रत्येक घरामध्ये आता वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड मीटर लावणं गरजेचं होणार आहे. 1 एप्रिलपासून हे मीटर लावणे गरजेचे होणार आहे.

पुढील 3 वर्षात स्मार्ट प्रीपेड मीटरनेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. मोबाईलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असणार आहे. केंद्र सरकारनं 2022 पर्यंतची यासाठी मुदत दिली आहे. या स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये शिल्लक रक्कम असेल तोपर्यंतच वीज वापरता येणार आहे. ती संपताच वीज पुरवठा बंद केला जाईल आणि कार्ड रिचार्ज केले तरच वीज पुरवठा सुरु होईल. मागेल त्याला वीज या योजनेखाली वर्षभरात 2.26 कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

नव्या ग्राहकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या या संख्येनुसार बिले पाठवणे आणि बिल वसूल करण वीज कंपन्यांना अवघड होत आहे. बिले विलंबाने गेल्याने वसुलीही वेळेत करता येत नाही. यातून वीज कंपन्यांना तोटाही होत आहे. बऱ्याचदा चुकीचे बील आले असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीही समोर येतात. वीजेची चोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ही वीजचोरी रोखणे शक्य होणार आहे.

अविरत विजेचा पुरवठा

येत्या 1 एप्रिल किंवा त्याआधीही सर्व ग्राहकांना अविरत वीज पुरविणे कंपन्यांना सक्तीचे होईल. मध्यंतरी राज्यांनी मागेल त्याला वीज पुरविण्याचे सामंजस्य करार केंद्राशी केले होते. त्याचाच हा भाग आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीत संबंधित राज्याचा वीज नियामक आयोग वीज कंपनीस यात सवलत देऊ शकेल.

स्मार्ट प्रीपेड मीटरचे हे असणार फायदे-

1) स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आता वीजचोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

2) वीज बिल वाढून येणे किंवा चुकीचे येणे असे अनेक प्रकार समोर यायचे. असे प्रकार बंद व्हायला मदत होईल.
3) जेवढी वीज वापरली तेवढ्याचेच पैसे द्यावे लागतील.
4) ग्राहक वीजेचा वापर जपून करतील त्यामुळे वीजेची बचत व्हायला मदत होणार आहे.
5) महत्त्वाचे म्हणजे बिल वसूलीच्या समस्येपासून कंपनीला सुटका मिळणार आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटरचे तोटे- 

1) स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये पैसे शिल्लक असेपर्यंत तुम्हाला वीजेचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तुमचा रिचार्ज संपला तर तात्काळ तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. पूर्वी तुमचे बिल थकले तरी तुम्हाला काही दिवसांची मुदत असायची लागलीच तुमचा वीज पुरवठा खंडित होत नव्हता. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

2) जरी एखाद्यावेळेस तुम्ही रिचार्ज केला आणि अकाऊंटमधून पैसे डिडक्ट झाले परंतु रिचार्ज सक्सेसफुल नाही झाला अशा काही तांत्रिक अडचणींचा सामनाही ग्राहकांना करावा लागू शकतो.
3) यासाठी केल्या जाणाऱ्या रिचार्जची प्रक्रिया किती सोपी असणार आहे हा प्रश्नही कायम आहेच.
4) इंडस्ट्रीयल भागांमध्ये असे मीटर असेल किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही जरी हे मीटर असलेच तर त्याचे चार्जेस वगैरे नेमके कसे असतील हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.
Loading...
You might also like