महाराष्ट्रात मराठी हवीच ! ठाकरे सरकार बदलणार 55 वर्षांपूर्वीचा ‘तो’ कायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचाअनिवार्य वापर करण्याबाबत राज्य सरकारने राज्याच्या स्थापनेपासून परिपत्रके जारी केली असली तरी मायमराठी भाषेचा वापर राज्याच्या कारभारात अधिक प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे आता सन 1964 चा महाराष्ट्र राजभाषा कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील 55 वर्षांत या कायद्यामध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही. पण, आता राज्याचा प्रशासकीय कारभार हा मराठी भाषेतून तसेच राज्याचा पूर्ण कारभार, अर्धन्यायिक निर्णय, संकेतस्थळे, महामंडळाचा कारभार मराठीतून झाला पाहिजे, यासाठी 1964च्या कायद्यात फेरफार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

महाराष्ट्रा राज्याची राजभाषा ही मराठी आहे, असा कायदा 1964 मध्ये केला. परंतु ही राजभाषा केवळ कागदावर राहिलीय. त्यानंतर राज्याचा कारभार मराठीतून झाला पाहिजे, अशी सरकारी परिपत्रके आत्तापर्यंत अनेकदा काढली. परंतु महाराष्ट्र राज्याच्या नोकरशहांनी या परिपत्रकांना जुमानले नाही. राज्यकर्त्यांनीही याकडे अधिक लक्ष दिले नाही.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिपत्याखालील सिडकोसारख्या अनेक महामंडळांची कारभाराची भाषा आजही इंग्रजी आहे. एमआयडीसीसारख्या अनेक मंडळांची संकेतस्थळे आणि कारभार याची भाषा इंग्रजी आहे. न्यायालयाशी संबंधित राज्य सरकारकडून सादर करण्यात येणारी प्रतिज्ञापत्रके इंग्रजी भाषेत असतात. त्यामुळे हा संपूर्ण कारभार मराठीतून व्हावा. तसेच तसा कायदा असावा, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय.

त्रिभाषा सूत्रानुसार केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयांनी, विमा कंपन्या, रिझर्व्ह बँक यांनी इंग्रजी, हिंदीसह मराठी भाषेचा वापर केला आहे का?, याचीही माहिती घेण्यात येणार आहे. 1964 च्या मराठी राजभाषा कायद्यात अधिक प्रमाणावर फेररचना करून हा मसुदा लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी आणण्यात येणार आहे.

राज्यातील ‘हे’ निकालही मराठी भाषेतून

राज्यातील ज्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षेत्रात 1964चा कायदा लागू होत नाही. त्या क्षेत्रात हा कायदा लागू करण्याची तरतूद मराठी राजभाषा कायद्यामध्ये करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून जमिनीच्या किंवा अन्य अर्धन्यायिक अपिलांबाबतचे निकाल हे इंग्रजी भाषेतून दिले जातात. हे निकालही मराठी भाषेतून देण्याबाबतची तरतूद या फेररचनेमध्ये असेल.