ख्रिसमस सणानिमित्त कॅम्प भागातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पुण्यातील कॅम्प भागात ख्रिसमस सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या भागातील वाहतूकीवर परिणाम होतो. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत आणि सुरक्षीत चालावी यासाठी या भागातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.  हे बदल उद्या (मंगळवार) सायंकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत असणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. या वेळेत अत्यावश्यक वाहनेच सोडण्यात येणार आहेत.

वाहतूकीत बदल खालील प्रमाणे
गोळीबार मैदान चौकातून एमजीरोड व पुलगेटकडे जाणाऱ्या रोडवरील वाय जंक्शन वरुन एम जी रोडकडे येणारी वाहतुक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक बंद करुन ती एसबीआय हाऊस चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करुन सरदची वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात आली आहे.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली असून ती इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात आली आहे.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करुन ती ताबुत स्ट्रीट मार्गे वळविण्यात आली आहे.

तरी वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.