महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात केले ‘हे’ बदल, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्यायनाच्या चारही पेपरमध्ये आयोगाने बदल केला आहे. आयोगाने चारही पेपरमध्ये थोडेफार बदल केले असून बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. या बदलाचं वैशिष्ट्य म्हणजे आयोगाने मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत, व्यापक आणि वर्तमान परिस्थिला सुसंगत केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण सहा पेपर असतात, त्यापैकी मराठी व इंग्रजी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. जे सामान्य अध्ययनाचे चार पेपर आहेत त्यामध्ये आयोगाने थोडा व्यापक बदल केला आहे.

सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये इतिहास आणि भूगोलाचा समावेश होतो. सर्वाधिक बदल याच पेपरमध्ये करण्यात आल्याचे दिसून येतेय. जुन्या अभ्यासक्रमानुसार समाज सुधारक हा घटक स्पष्टपणे नमूद नव्हता. मात्र त्यावर प्रश्न विचारले जात होते. आता नवीन अभ्यासक्रमामध्ये तो घटक ठळकपणे नमूद केला आहे. भूगोलामध्ये ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय हा घटक नव्याने समाविष्ट करुन आयोगाने वर्तमान परिस्थितीशी सुसंगत अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे.

सामान्य ज्ञान पेपर 2 मध्ये मुख्यत: राज्यव्यवस्था या घटकांशी संबंधित आहे. यामध्ये आयोगाने भारतीय प्रशासनाचा उगम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007 यासारख्या घटकांचा नव्याने समावेश केला आहे. विशेष म्हणजे लोकप्रशासन हा जो घटक आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता तो आता नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

सामान्य ज्ञान पेपर 4 जो मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या घटकांशी आहे. यामध्ये जास्त बदल केलेला नसून फक्त व्यावसायिक शिक्षण या घटकांमध्ये कौशल्य विकास या घटकाला अधोरेखित केलेले आहे व सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 समावेश केला आहे. सामान्य पेपर 4 हा अर्थव्यवस्था व विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाशी संबंधित आहे. यामध्ये जास्त बदल नसून फक्त नवीन अभ्यासक्रम शिस्तबद्ध पद्धतीने मांडण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके किंवा संकल्पना कुठल्या कराव्या यासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळेल.

आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे. विस्तृत, स्पष्ट, अद्यावत आणि चालू परिस्थितीला सुसंगत आहे. फक्त कमतरता एवढीच की इतिहास या घटकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापकीय व स्थापत्य कौशल्य समावेश करणे अपेक्षित होते. असे मत आर्थिक आणि राजकीय विश्लेषक अभिजित राठोड यांनी व्यक्त केले आहे.