खबरदार ! मांजरींना पोसाल तर 500 रुपयांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील एसटी (ST bus depot) महामंडळाच्या मुख्यालयात मांजरींची (Cat) संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारी हेच या मांजरींना पोसत आहेत. या मांजरींना खायला अन्न देत असल्याने मुख्यालयात मांजरींचा वावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मांजरींच्या विष्ठेमुळे मुख्यालयात दुर्गंधी झाली आहे. त्यामुळे मुख्यालयात मांजरी पोसताना किंवा त्यांना अन्न देताना कोणी आढळून आल्यास त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे आदेशच एसटी वाहतूक विभागाचे उपमहाव्यवस्थापकांनी काढले आहेत.

एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस स्थानके, परिसर, बस गड्या स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे. मात्र, मुख्यालयाील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मांजर प्रेमामुळे एसटीच्या मध्यवर्थी कार्यालयात घाण निर्माण झाली आहे. यापुर्वी मध्यवर्ती कार्यालयाची साफसफाई करण्याचे कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आले होते. मात्र आता रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करुन घेतली जात होते. मात्र आता तेही काम काही दिवसांपासून बंद असल्याने मांजरीच्या घाणीचा प्रकार उघडीस आला आहे.

एसटीच्या या मध्यवर्ती कार्यालयात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांचे कार्यालय आहे. तसेच इतर विभागातील महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापकांसह एसटी महामंडळाचा राज्याचा कारभार या कार्यालयांमधून चालवण्यात येतो. मुख्यालयातच साफसफाईचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजर प्रेम दाखवून त्यांना पोसत असताना किंवा त्यांना अन्न देताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.