पुण्यातील रस्त्यावर 12 जिवंत काडतुसे सापडल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरातील शाहू बँकेच्या चौकात तब्बल 12 जिवंत काडतुसे सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिवंत काडतुसे सापडल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्याची गडबड असते. धनकवडी आणि परिसरात मोठया प्रमाणावर चाकरमानी रहावयास आहेत. सकाळी कार्यालयाकडे जात असताना नागरिकांना धनकवडीतील शाहु बँकेच्या चौकात रस्त्यावर जिवंत काडतुसे पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. भर रस्त्यावर तब्बल 12 जिवंत काडतुसे आढळुन आली. पोलिसांनी ती हस्तगत केली आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्यातील अथवा इतर कोणीतरी पोलिस चहा पिण्यासाठी चौकात गेले असताना त्यांच्याकडील जिवंत काडतुसे नकळत रस्त्यावर पडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, भर रस्त्यावर पडलेली काडतुसे ही नेमकी कोणाची आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्त्यावरील पडलेली काडतुसे नेमकी कोणाची आहेत याचा पोलिस शोध घेत आहेत. रस्त्यावर पडलेली जिवंत काडतुसे ही 9 एम एम चे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यावर पडलेली जिवंत काडतुसे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. रस्त्यावर पडलेली काडतुसे ही एखाद्या पोलिसाची असल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर निश्‍चितच संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करीत आहेत.