‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय ! यंदाची चारधाम यात्रा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका चारधाम यात्रेला बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. ही यात्रा 14 मे रोजी सुरु होणार होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी चारधाम यात्रा रद्द केल्याची माहिती दिली. आज या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन विकास परिषदेच्या सभागृहात पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे केवळ पुजाऱ्यांनाच पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चारधाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे, असे रावत यांनी सांगितले.

रावत पुढे म्हणाले, कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मे रोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरु होणार होती. उत्तराखंड सरकारने गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द केली होती. त्यानंतर राज्य सरकारने 1 जुलै पासून श्रद्धाळूंसाठी चारधाम यात्रा सुरु केली होती. तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही सरकराने काही अटींसह परवानगी दिली होती.