जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण : यासिन भटकळवर आरोप निश्चित

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासीन भटकळ याला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात त्याच्यावर न्यायालयात आरोपनिश्चिती करण्यात आले. तर याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ जूनला करण्यात येणार आहे. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव तिहार जेलमधून व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार आहे.

मोहम्मद अहमद सिद्दीबप्पा उर्फ यासिन भटकळ (वय ३६,रा. भटकळ, उत्तर कर्नाटक) हा कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या बॉम्बस्फोटात १७ जण ठार तर ५७ जण जखमी झाले होते. त्याला २०१३ साली नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून य़ा खटल्यात त्याला पुण्यातील न्यायायलयात हजर करण्यात आले नव्हते. त्यानंतर त्याला आज सकाळी विशेष न्यायाधीश के. डी.वडणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. यावेळी त्याला त्याच्यावरील आरोपांबाबत म्हणणे विचारण्यात आले. तेव्हा मी निर्दोष असून माझ्यावरील आरोप निराधार आहेत. असे त्याने सांगितले.

त्याच्यावर जर्मन बेकरीसह इतर आणखी खटले देशभरात सुरु आहेत. दरम्यान त्याला दीड वर्षांपासून न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले नव्हते. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. मात्र त्याच्यावर देशभरातील वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांचे खटले दाखल असून त्यांची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याचा विचार करून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पुण्यात आणणे शक्य नाही. त्यासाठी मोठा स्थानिक पोलिस आणि विशेष पोलीस बलाचा बंदोबस्त लागू शकतो. म्हणून यासीन भटकळला पुढील सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणी दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आली. याप्रकऱणी पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.

यासीन भटकळ याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणीला हजर करण्याला त्याच्या वकीलांनी विरोध केला आहे. ते पुढील सुनावणीवेळी याविरोधात अर्ज सादर करणार आहेत.

कोण आहे यासीन भटकळ

मोहम्मद अहमद सिद्दीबप्पा उर्फ यासिन भटकळ (वय ३६,रा. भटकळ, उत्तर कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे भटकळमध्ये झाले. तो दहावीत नापास झाल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये दुबईला गेला. जानेवारी २००७ मध्ये तो दुबईतून गायब झाला. काही वर्षांपूर्वी त्याने नवी दिल्ली येथे झहिदा नावाच्या मुलीशी विवाह केला. २०१० पासून तो नेपाळच्या पोखरा येथील युनानी डॉ. शाहरुख याच्या हाताखाली काम करत होता. तो इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक सदस्य आहे.