‘लोकमंगल’च्या 9 जणांविरूध्द न्यायालयात ‘चार्जशीट’ दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   दूध भुकटी प्रकल्पासाठी बनावट कागद पत्रे सादर करुन शासनाकडून ५ कोटींचे अनुदान उचलल्या प्रकरणी लोकमंगल मल्टिस्टेटच्या ९ संचालकांविरुद्ध सोलापूरच्या न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आमदार सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्यासोबत रामराज राजसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजिनाथ लातूरे, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राम नरसगोडे अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

२०१५ साली लोकमंगल मल्टिस्टेटने दूध भुकटी प्रकल्प आणि विस्तारित दुग्ध व शाळेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र, या प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याने तत्कालीन दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी २८ नोव्हेंबर २०१८ साली सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार, चौकशीदरम्यान काही बनावट कागदपत्रे निदर्शनास आली होती.

दरम्यान, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापैकी ५ कोटींतील ५० टक्के रक्कम पतसंस्थेच्या जाईंट अकाउंट असलेल्या महाराष्ट्र बँकेत जमा झाली होती. चौकशी सुरु असताना हे पैसे बँकेतून काढण्यात आले नाही. नंतर हा प्रस्ताव रद्द झाला. आलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात लोकमंगल मल्टिस्टेटच्या ९ संचालकांविरुद्ध अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.