मुलासह डिएसके दाम्पत्यावर दोषारोपपत्र

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डि. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर कोल्हापूर आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र दाखल केले आहे. ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८० हजार ५१७ रुपयांची फसवणूक केल्याचे साडेचार हजार पानी दोषारोपपत्रात म्हटले आहे.

बाजीराव किल्लेदार या गुंतवणूकदाराने कोल्हापूरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून डिएस कुलकर्णी. पत्नी हेमंती कुलकर्णी, आणि मुलगा शिरीष यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर शहर, जिल्ह्यातून तक्रारींचा ओघ वाढत गेला. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार नोव्हेंबर २०१६ मध्ये उघडकिस आला होता. मुंबई, पुणे, आणि नतंर कोल्हापूर येथील ३५० गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर २८ जानेवारी २०१८ रोजी गुन्हे अन्वेषण शाखेकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. चौकशी अंती एकूण ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८० हजार ५१७ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. डिएसके ग्रुपच्या टोप (ता. हातकणंगले) येथील १, मालगाव (ता. मिरज) येतील ५, सोलापूरातील ७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली. ठेवीदारांचे हितसंरक्षण (एमपीआयडी) व फसवणूक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांच्या आधारे विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून अजून चौकशी सुरु आहे. त्यानुसार पुरवणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे.