बबीता फोगाटनं सोडली क्रीडा उपसंचालकाची नोकरी, आता करणार फुल टाइम पॉलिटिक्स !

चरखी दादरी : पोलीसनामा ऑनलाइन  –   दंगल गर्ल आणि अंतरराष्ट्रीय महिला पहिलवान बबीता फोगाटने क्रीडा उपसंचालक पदाचा राजीनामा दिला आहे. बबीताने आपला राजीनामा क्रीडा विभागाच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. यामध्ये तिने सरकारी नोकरी करण्यात असमर्थ असल्याचे जाहीर केले आहे. असे म्हटले जात आहे की, भाजपा नेता बबीता फोगाटचा उपयोग पक्ष बडोदा पोटनिवडणूक आणि आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून करू शकते. सध्या बबीताची राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी भेट होणार आहे. या भेटीनंतर स्थिती स्पष्ट होईल.

चरखी दादरीमधील बलाली गावची रहिवाशी असलेल्या बबीता फोगाटने मागील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हरियाणा पोलीस दलातील नोकरी सोडून भाजपा जॉईन केली होती. तिने चरखी दादरी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती, ज्यामध्ये ती तिसर्‍या नंबरवर राहीली होती. भाजपा महिला नेता म्हणून काम करणार्‍या बबीताला या वर्षी 30 जुलैमध्ये क्रीडा विभागाचे उपसंचालक बनवण्यात आले होते. मात्र, दोनच महिन्यात बबीताने राजीनामा दिल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

बबीता फोगाटने न्यूज 18 ला फोनवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, तिने क्रीडा विभागाच्या मुख्य सचिवांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, सरकारी नोकरी करण्यास असमर्थ आहे. यासाठी एक महिन्याची नोटीस समजून राजीनामा स्वीकरण्याबाबत लिहिले आहे.

बबीताने सांगितले की, बुधवारी सीएम खट्टर यांची भेट घेणार आहे आणि पार्टीसाठी काम करण्याबाबत यावेळी चर्चा केली जाईल. तिने म्हटले की, जर पार्टीने बडोदा आणि बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काही जबाबदारी दिली तर ती पार पाडेन.