कांदिवलीतील साईबाबा मंदिरात आग लागली नाही तर लावली, तिघांचा खूनच

कांदिवली : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी पहाटे चारकोच्या साईबाबा मंदिरात लागलेली आग ही लागली नसून लावण्यात आली होती. नेहमीच्या मारहाणीला कंटाळून दोघांनी धडा शिवकवण्यासाठी मंदिरात पेट्रोल टाकून आग लावली होती. या घटनेत तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी भावेश चांदोरकर याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

कांदिवलीच्या चारकोप परिसरात साईबाबा मंदिर आहे. शनिवारी रात्री मनू राधेशाम गुप्ता, सुभाष खोडे, युवराज पवार हे तिघे झोपायला गेले होते. रविवारी पहाटे मंदिरात लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर फॉरेन्सिक लॅबचे पथकाने तपासणी केली. त्यावेळी लागलेली आग शॉकसर्किटमुळे लागली नसल्याचे चारकोप पोलिसांना सांगण्यात आले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता. त्यांना भावेश आणि युवराजमधील पूर्वीच्या वादाची माहिती मिळाली.

दीड वर्षापूर्वी भावेश आणि युवराजचा क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. तेव्हा युवराजने भावेशला मारहाण केली होती. जेंव्हा-जेंव्हा भावेश भेटेल तेव्हा युवराज हा त्याला मारहाण करत होता. यामध्ये सुभाष हा युवराजला मदत करत होता. घटनेच्या दोन दिवस आधी युवराजने भावेशला सिगरेट आणण्यासाठी पाठवले. तेव्हा भावेशने नकार दिला. त्यामुळे युवराजने भावेशला मारहाण केली. याचा राग भावेशच्या मनात होता.

उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या सुचनेनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सातपुते, पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम बाबर, वाघमारे यांच्या पथकाने भावेशचा शोध घेतला. त्यावेळी भावेश औरंगाबाद येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबाद येथे जाऊन भावेशला अटक केली.

दोन दिवसांपूर्वी रचला कट

युवराजकडून नेहमी होणाऱ्या मारहणीला कंटाळून भावेषने सुभाष आणि युवराजला धडा शिकवण्याचा कट रचला. त्यासाठी भावेशने समतानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाची मदत घेतली. शनिवारी सायंकाळी युवराज आणि सुभाष या दोघांनी अतिप्रमाणात दारु प्यायली. रात्री झोपण्यासाठी ते मंदिरात गेले. मंदिरात झोपल्याची खात्री झाल्यावर पहाटे भावेशने स्वत:च्या मोटारसायकलमधून पेट्रोल काढून मंदिरात टाकले.

पेट्रोलमुळे लागलेल्या आगीत मंदिरातील कुलरचा स्फोट झाला. आगीनंतर भावेशने अल्पवयीन मुलाला समतानगर येथे सोडले. त्यानंतर घरी येऊन तो झोपला. पहाटे आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच त्याने मावशीकडे जात असल्याचे सांगून तो बोरिवली येथून औरंगाबादला गेला. मयत मोनू हा लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच मंदिरात झोपण्यासाठी आला होता आणि त्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.