मिलिंद एकबोटे ‘कृष्णकुंज’वर, मनसे अध्यक्षांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चर्चा केली.

दरम्यान मिलिंद एकबोटे यांना या भेटीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, २४ मार्चला छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असून या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे यांनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि जनतेला मार्गदर्शन करावं, यासाठी मी राज ठाकरेंची भेट घेतली असे त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद एकबोटे यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले असून हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

पुण्यात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी आणि दंगल भडकावण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जानेवारी रोजी विजय दिनाच्या दिवशीच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडें यांसह तब्बल १६३ लोकांना पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी केली होती. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास चालू आहे.