दोन गावठी पिस्तूलांसह दोघे चतुश्रृंगी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या दोन सराईतांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकून ९० हजार रुपये किंमतीची दोन गावठी पिस्तूले व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मुयर जयसिंग गायकवाड (२४, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) व अमर बाळासाहेब गायकवाड (२१, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील मीटकॉन कॉलेजजवळ दोघेजण गावठी पिस्तूलासह फिरत असल्याची माहिती चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी तपास पथकासह तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची झडती घेतल्यावर मयुर गायकवाड याच्याकडे एक लोखंडी रिव्हॉल्वर (सिक्सर) व एक काडतुस, अमर शेवाळे याच्याकडे एक लोखंडी गावठी पिस्तूल व एक काडतुस आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ते जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आय़ुक्त कल्याण विधाते वरिष्ट पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, कर्मचारी बाळासाहेब गायकवाड, एकनाथ जोशी, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, दादा काळे, संतोष जाधव, तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, संजय वाघ, अजय गायकवाड, अमर शेख यांच्या पथकाने केली.