मित्राच्या नावाने आलेल्या ‘त्या’ मेसेजमुळे होऊ शकतो घात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अनेकांना मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज येतो आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात 1 हजार रुपये जमा केल्याचा हा मेसेज आहे. परंतु असा मेसेज जर तुम्हाला आला तर तुम्हाला सावधगिरी पाळणे गरजेचे आहे. कारण या मेसेजमधील लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या बँकेतील पैशांवर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांना मोबाईलवर मेसेज येत आहे. बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून हा मेसेज येत आहे. तुमच्या मित्राने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहेत असं यात सांगितलं जातं. त्यासाठी एक्सओएमएमएफएल हा कोड वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा असं त्यात सांगितलं जात. ज्याला हा मेसेज येतो त्यांना मित्राने पैसे पाठवले आहेत असं वाटायला लागतं. त्यामुळे संबंधित मोबाईलधारक त्या लिंकवर क्लिक करुन लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करतो. मात्र असं झाल्यास तुमची फसवणूक होऊ शकतं असं सायबर एक्सपर्ट्सने सांगितलं आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे मेसेज हे फसवे आहेत. अशा लिंक डाऊनलोड करणे तुमच्यासाठी घातक ठरु शकते. यामुळे तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचतो. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार तुमच्या बँकेतील पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे अशा मेसेजवर क्लिक न करता तो मेसेज डिलीट करणंच तुमच्यासाठी योग्य आहे असं सायबर पोलिसांचं म्हणणं आहे.

मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास काय घडते?

जर तुम्ही मेसेजमधील लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला एक अॅप्लिकेशन इन्स्टाॅल करण्यास सांगितले जाते. नंतर परमिशन अलाऊ करण्यास सांगितले जाते. यात आपले फोन नंबर, लोकेशन, फोन स्टोअरेज आणि अन्य माहिती या अप्लिकेशनच्या माध्यमातून डेव्हलेपरकडे सेव्ह होते. त्यामुळे असा मेसेज जर तुम्हाला आलाच तर तुम्ही अशा लिंकवर क्लिक करु नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.