लष्करात नोकरीच्या आमिषानं 12 लाखांची फसवणूक, चौघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्करात नोकरी देण्याच्या आमिषाने 3 युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा युवकांची एकुण 12 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात शरद गोयकर (26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोयकर यांची आरोपींशी एका मध्यस्थामार्फत ओळख झाली. लष्करातील अभियांत्रिकी विभागात लिपिक तसेच भांडार सामुग्री व्यवस्थापक पदाच्या जागेवर नोकर भरती असल्याचं आरोपींनी गोयकर यांना सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांना नोकरीचं आमिष देखील दाखविण्यात आलं. त्यानंतर त्यांनी गोयकरांना लष्कर परिसरातील दक्षिण मुख्यालयाच्या परिसरात भेटण्यास बोलावले. गोयकर हे त्यांचे मित्र श्रीराम चव्हाण आणि अंकुश धरणे यांच्यासह गेले.

दक्षिण मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या पार्किंगवर ते भेटले. त्यानंतर आरोपींनी तिघांकडून 12 लाख रूपये घेतले. काही दिवसानंतर गोयकर यांनी आरोपींच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांना तो मोबाईल बंद असल्याचं समजलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोयकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ बिराजदार करीत आहेत.

Visit : Policenama.com