मोलकरीण देतो सांगून वृद्धाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – घर कामासाठी मोलकरीण देतो सांगून, २६ हजार रुपये बँक खात्यावर मागवून, फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला. या प्रकरणी भास्कर दौलतराव वसाने (६५, रा. बावधन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर नितीनसिंग (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर यांच्या नातवाला सांभाळण्यासाठी तसेच घर कामासाठी त्यांना एका सेविकेची गरज होती. त्याबाबत त्यांच्या मुलाने ऑनलाइन माहिती घेऊन रुद्र साई इंटरप्राईजेसच्या नितीनसिंग याच्याशी संपर्क केला. त्याने सुरुवातीला त्याच्या बँक खात्यावर २६ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार भास्कर यांनी नितीनसिंग याच्या बँक खात्यावर २६ हजार रुपये जमा केले. पैसे मिळून देखील नितीनसिंग याने सेविका न देता भास्कर यांची आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.