बनावट सातबाऱ्यावर पाच लाख उकळणारा अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट सातबारा तयार करून जमीन आपल्या नावावर आहे असे भासवत ती विक्रीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनीट एकने अटक केली आहे. दिनेश भोईर (२८, रा. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील कलीम खान (३८) यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील रहिवासी असलेल्या भोईर याची ओळख झाली. त्याने ठाणे जिल्ह्यातील शिरगाव (ता. अंबरनाथ) येथील जमीन आपल्या मालकीची असल्याचा बनावट सातबारा उतारा त्यांना दाखवला. त्यानुसार, या उताऱ्यावरील ४.२ गुंठे जमिनीचा व्यवहार २२ लाख रुपयांना ठरवून तसे खरेदीखतही करुन दिले. त्यापोटी खान यांच्याकडून पाच लाख रुपये घेण्याचे उर्वरित १७ लाख रुपये तीन महिन्यांच्या कालावधीत द्यायचे ठरवले. त्यानंतर खान यांच्याकडून ९ जुलै २०१५ रोजी ठाण्याच्या कोर्टनाका येथे पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर सातबारा बनावट असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे परत मागितले

आपले पैसे परत न मिळाल्याने खान यांनी याप्रकरणी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केल्यानंतर भोईरला अटक करण्यात आली आहे.