भुलथापांना बळी पडला अन् तिच्याकडून संगणक अभियंता 23 लाखाला गंडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मिडीयाव्दारे ओळख झाल्यानंतर महिलेने साथीदारांच्या मदतीने एका संगणक अभियंत्याला तब्बल 23 लाख 50 हजार रूपयांना गंडविल्याची धक्‍कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात संबंधित महिलेसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात 38 वर्षीय संगणक अभियंत्याने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगणक अभियंता हे वानवडी परिसरात रहावयास असुन ते एका आयटी (माहिती-तंत्रज्ञान) कंपनीत कामाला आहेत. त्यांची सुमारे दोन वर्षापुर्वी सोशल मिडीयाव्दारे एका महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये गुप्‍तगु चालु झाले.

मे 2017 मध्ये संगणक अभियंत्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला आणि दिल्‍ली विमानतळावर एका मित्राला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्याला सोडविण्यासाठी तात्काळ पैशाची गरज असून त्याच्याकडे परकीय चलन असल्याचे तिने संगणक अभियंत्याला सांगितले. वेळावेळी सोशल मिडीयाव्दारे चॅटिंग होत असल्याने आणि त्या महिलेवर संगणक अभियंत्याचा विश्‍वास बसल्याने त्यांनी तिने दिलेल्या बँक खात्यात 23 लाख 50 हजार रूपये भरले. काही दिवसानंतर आपली फसवणुक झाल्याचे संगणक अभियंत्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या तपासाअंती अज्ञात महिलेसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.