९१ लाखाची फसवणूक : श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे शिवाजी ढमढेरे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बचत गटातील महिलांना गुंतवणुकीचे आमिष दाखवुन तब्बल ९१ लाख ६२ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव शेरी परिसरातील श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे संस्थापक शिवाजी तुकाराम ढमढेरे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांविरूध्द चंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी तुकाराम ढमढेरे, मंदाराणी शिवाजी ढमढेरे, सविता विजय थोरात (रा. ममता सोसायटी एरिया, ज्युपिटर कॉम्प्लेक्स, वडगांव शेरी), विजय थोरात, अंजली थोरात आणि इतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिना मोहन इंगळे (40, रा. माळवाडी, वडगांव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही फसवणुक दि. १० डिसेंबर २०१५ ते आजपर्यंत झालेली आहे. आरोपींनी आपआपसात संगणमत करून महिला बचत गट तयार करून इतर महिलांकडून पैसे जमा केली आणि शेअर्स खरेदी करण्यास सांगितले. श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघ संचलित शिवजीत मुद्रा क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाविरूध्द महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाने बचत गटाची स्थापना करण्याबाबत सुचविले होते. त्यानंतर बचत गटातील महिलांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या. महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष देखील दाखविण्यात आले. जमा झालेल्या ठेवी शिवजीत मुद्रा क्रेडीट को-ऑप सोसायटीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

ठेवींची मुदत संपल्यानंतर महिलांना मुद्दल तसेच व्याज देण्यात आले नाही. त्याबाबत काही महिलांनी विचारणा केली. त्यावेळी बँकेच्या शाखा या बारामती आणि लोणंद परिसरात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लकी ड्रॉ सारखी योजना देखील सुरू करण्यात आली होती. अधिक तगादा लावुन पैशांची विचारणा महिलांनी केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्‍तरे देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी इंगळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. इंगळे यांची वैयक्‍तिक ११ हजार आणि इतर महिलांची अशी एकुण ९१ लाख ६५ हजार ५४६ रूपयांची फसवणुक झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.