कर्ज मंजूर केल्याचे सांगून सव्वा तीन लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुर झाल्याचे पत्र दिले. त्यासाठी तीन लाख 18 हजार 50 रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भालचंद्र रघुनाथ पालव (व25), रोहित सुसेर नागवेकर, समीर, महेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय इसमाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत पीसीएमसी कॉलनी अजमेरा कॉम्प्लेक्स पिंपरी येथे ही घटना घडली.

आरोपींनी फिर्यादी व्यक्तीला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विजयदीप संस्था मर्यादित डहाणू या अस्तित्वात नसलेल्या पतसंस्थेचे लेटरहेड व शिक्का तयार करून बनावट कर्ज मंजुरीचे पत्र फिर्यादीना दिले. त्यानंतर आरोपींनी ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगत फिर्यादीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात घेतले. पैसे घेऊन फिर्यादीचे कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com