बनवाट आधार कार्ड़ व पॅन कार्ड तयार करून फसवणूक करणारा सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून देणाऱ्या सराईताला छापा टाकून मुंढवा पोलीसांनी अटक केली असून त्याच्या दुकानातून पोलिसांनी ५१ हजार रुपयांचा प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. राहूल नागनाथ ईप्पर (२८, गाडीतळ हडपसर, मुळ नागझरी ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी औरंगाबाद, अहमदपूर व अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल ईप्पर हा मुंढवा येथील केशवनगर परिसरात साईबाबा बिझनेस ब्रांडींग सर्विसेस या दुकानात लोकांना त्यांच्या कामासाठी पाचशे रुपयात बनावट कागदपत्रे तयार करून देतो अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस शिपाई शाम शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. तसेच तो मुळ आधार कार्ड व पॅनकार्डमध्ये हवे तसे बदल करून देतो त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुकानात एक बनावट ग्राहक पाठवला. त्याने आधार कार्डवरील फोटो व पत्ता बदलून दिला. त्याला एक बनावट आधार कार्ड तयार करून दिले.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा दुकानातून संगणक, प्रिंटर, स्कॅनर यांच्या साह्याने त्याने बनावट आधार कार्ड बनवून दिले असल्याचे समोर आले. त्याच्याकडे यासंदर्भातील कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी दुकानातून ५१ हजार रुपये किंमतीचा संगणक, प्रिंटर, स्कॅनर व काही बनावट आधार कार्ड जप्त केले आहेत. त्याच्यावर यापुर्वी औरंगाबाद व अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली. त्यानंतर त्याला अटक केली. तर त्याच्याकडून कोणी आधार कार्डमध्ये काही बदल करून घेतले असल्यास त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्याच्या ०२०-२६८९०१५३ किंवा पोलीस उपनिरीक्षक गवळी यांच्या ८१०८५५११७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) महेंद्र जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. जी. गवळी, पोलीस कर्मचारी चव्हाण, काकडे, जाधव यांच्या पथकाने केली.