बनावट पासपोर्ट, व्हिसाद्वारे तब्बल १५ राज्यांतील लोकांची फसवणूक करणारा अटकेत

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट पासपोर्ट व व्हिसाद्वारे १५ राज्यांतील लोकांची फसवणूक करणाऱ्यास पालघर एटीएसने अटक केली आहे. उबेद अली अकबर शेख (४३) असे आरोपीचे नाव असून त्याने आखाती देशात नोकरी देतो, असे सांगून बनावट व्हिसा, पासपोर्ट बनवून लोकांची फसवणूक केली. फसवणूक करणारा उबेद शेख हा एकटा नसून त्याचे आणखी आठ सहकारी आहेत. यांचा प्रमुख तसेच उबेदचा काका उस्मान शेख याला गेल्या वर्षीच अटक करण्यात आली होती. उबेदचे वडीलही हेच काम करतात. न्यायालयाने त्याला २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशात नोकरी देतो, असे सांगून आमिष दाखवून उबेद अली हा लोकांकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना बनावट पासपोर्ट, व्हिसा बनवून द्यायचा. एअरपोर्टवर गेल्यानंतरच आपल्याकडे असलेला व्हिसा आणि पासपोर्ट बनावट असल्याचे लोकांना समजत असे.

त्याने आत्तापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, लखनौ, हैद्राबाद, अहमदाबाद, इलाहाबाद, केरळ, दार्जिलिंग, बेळगाव, बेंगलोर, इंदोर, भोपाळ, बिहार राज्यातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. या सर्व राज्यांतील पोलीस त्याचा शोध घेत होते. तो जेथे जाईल तेथे नाव बदलून राहायचा. गेल्या गेल्या दीड महिन्यांपासून दहशतवाद विरोधी पथक त्याच्या मागावर होते. अखेर त्याला खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कामाठीपुरा येथून ताब्यात घेण्यात एटीएसला यश आले.