जमिनीच्या व्यवहारात फसवणूक : माजी नगरसेवक कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका जमिनीसाठी पैसे घेऊन ती दुसऱ्याला विकली, त्यानंतर दूसरी जमीन घेऊन देतो असे सांगून एका डॉक्टरची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि.22) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलानी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (33, रा.ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली असून आरोपी व फिर्यादी यांच्यात चिखली गट क्रमांक 383 येथील जमिनीबाबत व्यवहार झाला होता. तसेच त्या जमिनीबाबत खरेदीखत करण्यात आले होते. दरम्यान ही जमीन दुसऱ्याच्याच नावावर असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.

याबाबत विचारले असता तुम्हाला दुसरी जागा देतो. मात्र त्यासाठी आणखी थोडी रक्कम द्यावीलागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून 22 लाख 50 हजार रुपये घेतले. हा व्यवहार 19 मे 2015 ते 20 एप्रिल 2019 च्या कालावधीत झाला आहे. मात्र अद्याप फिर्यादी यांना जमीन किंवा रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.