Pune : लग्नाच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेटिंग साईटवरून ओळख करत एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ९३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. डिसेंबर २०१९ ते मे २०२० या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्यांनी लग्नासाठी एका सोशल साईटवर नावनोंदणी केली होती. त्यानुसार सायबर चोरट्याने तरुणीशी संपर्क करुन ओळख वाढविली.

त्यानंतर तिला लग्न करू असे आमिष दाखविले. त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्याकडून ऑनलाईनरित्या ९३ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तिच्याशी संपर्क कमी केला. त्यावेळी तरुणीला फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.