बनावट ठेवींच्या पावत्या देऊन बांधकाम विभागाची (PWD) फसवणूक, कंत्राटदाराविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   नोंदणीकृत कंत्राटदाराने शासनाला ठाणे येथील जनता सहकारी बँकेत ठेवी ठेवल्याच्या खोट्या व बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पंडित सावंत (वय 44) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटदार सोपान जनार्दन घोडके (वय 37, रा. विशाखा सोसायटी, कर्वेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शासनाचा नोंदणीकृत कंत्राटदार आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कामांच्या निविदा निघाल्या होत्या. त्यावेळी त्याने कमी दराने (मायनस) कंत्राट भरून या निविदा मिळवल्या. तसेच कामाचे कार्यरंभ आदेश मिळवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमेच्या मूल्याचे ठाणे येथील जनता सहकारी बँकेचया 2 कोटी 87 लाख 11 हजार 300 रुपयांच्या मुदत ठेवीचे बनावट व खोट्या सर्टिफिकेट बांधकाम विभागाकडे जमाकरून शासनाची फसवणूक केली. हा सर्व प्रकार 2018 ते 2020 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत शिंदे हे करत आहेत.