Vizag Gas Leak : विशाखापट्टणममध्ये केमिकल गॅस गळतीमुळे 11 लोकांचा मृत्यू तर 800 रुग्णालयात, मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी देणार सरकार

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर उद्योगात केमिकल गॅस गळती झाली. गुरुवारी सकाळी आरआर व्यंकटपुरम गावात झालेल्या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 800 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. सध्या गॅसच्या गळतीवर नियंत्रण आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेसंदर्भात एनडीएमएची तातडीची बैठक बोलवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह हेही या बैठकीत उपस्थित आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी पीडितांना भेटण्यासाठी रूग्णालयात रवाना झाले आहेत. घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. कंपनीच्या आसपासची पाच गावे खाली करण्यात आली आहेत.

पीएम मोदींनी बोलवली एनडीएमएची बैठक

विशाखापट्टणममधील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते घटनेसंदर्भात गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) च्या अधिकाऱ्यांशी बोलले आहेत. या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मी विशाखापट्टणममधील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

गॅस गळतीची घटना चिंताजनक: अमित शहा

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा म्हणाले की, विजगमधील गॅस गळतीची घटना चिंताजनक आहे, आम्ही सतत व बारकाईने घटनेचे निरीक्षण करत आहोत. मी विशाखापट्टणममधील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डीनी व्यक्त केले दुःख

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, गॅस गळतीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांबद्दल मला संवेदना आहेत. मी राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याशी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोललो आहे.

ते पुढे म्हणाले की, एनडीआरएफच्या टीमला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अभूतपूर्व आणि दुर्दैवी घटनेत शेकडो लोक प्रभावित झाले आहेत. गृहसचिव व जीओआयशी बोलणे झाले आहे आणि त्यांना आवश्यक ती मदत देण्याची विनंती केली आहे.

800 लोक रुग्णालयात भरती

विशाखापट्टणमचे सीपी आरके मीना म्हणाले की, गॅसला निष्प्रभावी केले गेले आहे. एनडीआरएफची टीम वेळेवर घटनास्थळी पोहोचली आहे. त्याचा जास्तीत जास्त परिणाम सुमारे दीड किमीपर्यंत झाला होता, परंतु त्याचा वास सुमारे अडीच किमीपर्यंत होता. 800 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

पीडितांना भेटण्यास रुग्णालयात रवाना झाले सीएम

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी गॅस गळतीच्या घटनेची चौकशी केली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की मुख्यमंत्री पीडितांना भेटण्यासाठी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी तातडीने पावले उचलण्याचे आणि सर्व सहकार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तीन किमीपर्यंत परिसर प्रभावित

आरआर व्यंकटपुरममध्ये असलेल्या एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी गॅस गळतीमुळे कंपनीच्या सभोवतालच्या तीन किलोमीटर क्षेत्रावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.