खंबाटकी घाटात केमिकलचा टँकर उलटल्याने वाहतूकीचा खोळंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून कोल्हापूरकडे केमिकल घेऊन जाणारा टँकर खंबाटकी घाटात उलटल्याने घाटात वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.
नाईटाईड अ‍ॅसिड घेऊन गुरुवारी सकाळी ८ वाजता एक टँकर खंबाटकी घाटातून जात होता. घाटातील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. त्यामुळे टँकरमधून अ‍ॅसिडची गळती सुरु होऊन त्यातून धूर येऊ लागला व त्याचा उग्र वास येऊ लागला. याची माहिती मिळताच सातारा पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी खबरदारी म्हणून वाहतूक थांबवून ठेवली. अग्निशामक दलाने ही गळती रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्ण यशस्वी होऊ शकला नाही.

पुण्याहून ऑईल कंपनीचे अधिकारी घटनास्थळी निघाले आहेत. दोन तासानंतर गळती कमी झाल्यावर हळू हळू वाहतूक सुरु करण्यात आली आहे. ऑईल कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहचून गळती बंद केल्यानंतर टँकर बाजूला हलविण्यात आल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत होऊ शकणार आहे.