पुण्यात सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानं दोघांवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीच्या आवारात सिगारेट ओढण्यात आल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून दोघावर गॅस शेगडी साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅसिड सदृश्य रसायन फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर, छाती आणि ओठावर दुखापत झाली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास बाणेर फाटा येथे घडला.
याप्रकरणी बाणेर फाटे येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे जवळपास राहण्यास आहेत. त्यामुळे ते एकमेकांचे ओळखीचे आहेत. बुधवारी पहाटे आरोपी हे फिर्यादी रहात असलेल्या सोसायटीच्या आवारामध्ये सिगारेट ओढत होते. त्यांना सिगारेट ओढण्यास फिर्य़ादी यांनी मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाली. त्यावेळी मित्राने त्यांच्यातील वाद सोडवला होता.

या घटनेची माहिती फिर्य़ादीने पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले. पोलीस निघून गेल्यानंतर आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आले. आरोपी गॅस एजन्सीमध्ये कामाला असल्याने त्यांच्याकडे गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅसिड सदृश्य रसायन होते. त्यांनी हे रसायन फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या अंगावर फेकले. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण करीत आहेत.

Advt.

Visit – policenama.com