चेन्‍नईत विद्यार्थ्यांच्या २ गटात तुंबळ हाणामारी, ७ जण जखमी (व्हिडीओ)

चेन्नई : वृत्तसंस्था – मंगळवारी चेन्नईच्या अरुंबक्कम परिसरातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत किमान ७ जण जखमी झाले. पचायप्पा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक विद्यार्थी हातात शस्त्र घेऊन बसमधील काही विद्यार्थ्यांना दाखवतो. त्यानंतर हा गट मद्रास ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन (एमटीसी) बसमध्ये चढताना दिसून येत आहे. बसमधील प्रवासी आरडाओरडा करताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमटीसी बस रस्त्यावरून जात असताना महाविद्यालयाच्या दोन गटांमध्ये भांडण सुरू झाले. विद्यार्थ्यांचा एक गट ताब्यात घेण्यात आला आहे आणि तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी १७ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांकडून लिहून घेतले आहे की विद्यार्थी अशा घटनांमध्ये पुन्हा सहभागी होणार नाहीत. अशा घटनांपासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे यासाठी पोलिसांनी महाविद्यालयात पत्रके देखील वाटली आहेत. गेल्या वर्षी, कमीतकमी चार विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावण्यासाठी अटक करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त