अखेर सुरेश रैनानं मौन सोडलं, सांगितलं IPL 2020 मधून माघार घेण्यामागचं खरं कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  चेन्नई सुपर किंग्सचा उपकर्णधार सुरेश रैनाने इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) १३ व्या पर्वातून अचानक माघार घेत सर्वांना धक्का दिला होता. त्याच्या या निर्णयामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापनासोबत झालेला वाद, कारणीभूत असल्याची चर्चा होती.

सुरेश रैनाच्या अचानक जाण्याने संघचालक एन. श्रीनिवास यांनी त्याच्यावर टीका केली होती. कधी कधी प्रसिद्धीची हवा तुमच्या डोक्यात जाते, असा आरोप त्यांनी केला होता. पंरतु, एका इंग्रजी वृत्तपत्राला बोलताना त्या निर्णयामागचे खरे कारण रैनाने सांगितले आहे. तसेच त्या निर्णयाचा पश्चाताप होत नसल्याचे त्याने नमूद केलं आहे.

सुरेश रैना म्हणाला, “मला पश्चाताप का पाहिजे? मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवला आणि माझ्या कुटूंबासाठी हा निर्णय घेतला,” असे त्याने स्पष्ट केलं. पुढे त्याने सांगितलं, “माझ्या कुटूंबासाठी मला परत यायचे होते. पंजाबमध्ये माझ्या आत्या व काकांसोबत जे झाले, तेव्हा त्यांना माझी अधिक गरज होती. कोरोना संसर्गादरम्यान मी कुटूंबासोबत राहावे, असे पत्नीला वाटतं होते. मी २० वर्ष झाले क्रिकेट खेळतोय. त्यामुळे मी पुनरागमन करेन, याची मला खात्री आहे. मात्र, जेव्हा कुटूंबाला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असायला हवे. तेव्हा तेच योग्य होते,” असेही रैनाने म्हटले.

दरम्यान, आयपीएल २०२१ मध्ये रैना खेळणार की नाही, याबाबत अजून अधिकृत वृत्त मिळाले नाही. पण, काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार CSK रैनाला त्यांच्या टीम मध्ये ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.