‘या’ 8 सरकारी बँकांमध्ये असेल खाते तर होळीपूर्वी करा हे आवश्यक काम; अन्यथा पैसे काढताना येईल अडचण

नवी दिल्ली : बँक कस्टमर्ससाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या आठ बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड (आयएफएससी) इनव्हॅलिड होईल, म्हणजे 1 एप्रिलपासून तुमचे जुने चेकबुक कामाचे राहणार नाही. बँकेकडून चेकद्वारे पैसे मिळणार नाही. अशा बँकेत खाते असेल तर नवीन चेकबुक घ्या. तुमच्याकडे यासाठी 5 दिवस राहिले आहेत. आज (शुक्रवार) आणि सोमवारीच बँकेचे कामकाज होईल. यानंतर होळीची सुट्टी असल्याने बँक बंद राहिल.

मोदी सरकारने अनेक बँकांचे विलिनिकरण केले आहे. बँकांच्या वाढत्या एनपीएच्या ओझ्यामुळे मोदी सरकारने काही बँकांचे विलिनिकरण केले. या विलिनिकरणानंतर या बँकांचे चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड इत्यादी 1 एप्रिल पासून बदलणार आहे. देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि इलाहाबाद बँक या बँकांचा समावेश आहे.

कोणत्या बँकेचे कोणत्या बँकेत झाले विलिनिकरण –

* देना बँक आणि विजया बँकेचे विलिनिकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले.
* ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलिनिकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले आहे.
* सिंडिकेट बँकेचे विलिनिकरण कॅनरा बँकेत झाले आहे.
* आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनिकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले आहे.
* इलाहाबाद बँकेचे विलिनिकरण इंडियन बँकेत झाले आहे. या सर्व 1 एप्रिल 2020 पासून प्रभावाखाली आल्या आहेत.