Birthday SPL : आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टीस, आता आहे टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन ! ‘या’ गोष्टीचं आजही होतंय दु:ख

पोलिसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. चेतेश्वरचा (Cheteshwar Pujara) जन्म 25 जानेवारी 1988 रोजी राजकोटमध्ये झाला आहे. आजे तो टीम इंडियाचा प्रमुख आणि भरवशाचा फलंदाज आहे. गेल्या एका दशकापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यानं क्रिकेटसाठी खूप कष्ट घेतले आहे. कुटुंबानंही त्याला खूप सपोर्ट केला आहे. टीम इंडियाकडून खेळताना राहुल द्रविडनंतर त्यानं तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 18 शतकं आणि 28 अर्धशतकांच्या मदतीनं त्यानं 81 कसोटीत 6111 धावा केल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळाला. यात पुजारानंही चांगलं योगदान दिलं. कसोटी किक्रेटर होण्यासाठीचा त्याचा प्रवास खूप कठीण होता. त्याच्या आईनंही त्याच्यासाठी खूप काही केलं आहे. याबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.

पुजाराची आई रिना यांनी पुजारानं टीम इंडियाकडून खेळावं हे स्वप्न पाहिलं. त्याचे वडिल अरविंद यांनीही त्याची प्रतिभा ओळखली होती. त्यांनी त्याचा खास सराव सुरू केला. ते स्वत: रणजी ट्रॉफी पर्यंत खेळले होते. पुजाराला त्याची पहिली बॅट त्याच्या आईनं भेट म्हणून दिली होती. आईनं त्याच्यासाठी 1500 रुपयांची बॅट घेतली होती. खास बात अशी की, आईनं घेतलेल्या या बॅटचे पैसे त्यांनी हप्त्यानं दिले होते. त्यावेळी चेतेश्वर अवघ्या 8 वर्षांचा होता. त्यांची उंची कमी होती, यामुळं त्याला इतरांचे बॅटींग पॅड्स व्यवस्थित येत नसत. यावेळी त्याच्या आईनं हातानं त्याच्यासाठी पॅड्सची जोडी तयार केली होती.

आईनं दिलेल्या भेटीचा सन्मान करत चेतेश्वरनं देखील खूप मेहनत घेतली. त्यानं कष्ट करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली जागा पक्की केली. त्याचं भारताकडून खेळण्याचं स्वप्नही साकार केलं. परंतु जेव्हा त्यानं भारताकडून खेळण्यात पदार्पण केलं तो क्षण त्याची आई पाहू शकली नाही. त्याच्या पदार्पणापूर्वीच रिना यांचं कॅन्सरनं निधन झालं. आजही त्याला या गोष्टीचं मोठं दु:ख आहे. त्यानं आईचं स्वप्न साकारण्यासाठी कोणतीच कसर न करता प्रचंड मेहनत घेतली.

9 ऑक्टोबर 2010 मध्ये चेतेश्वरनं ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण केलं. तेव्हापासून सुरू झालेला त्याचा प्रवास अजूनही यशस्वीरित्या सुरू आहे. असं सांगतिलं जातं की, 300 धावा करून बाद झाल्यानंतरही तो स्वत:वर नाराज असतो. त्याच्या याच दृढतेचा टीम इंडियाला फायदा झाला आहे. याची झलक नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पाहायला मिळाली.