छगन भुजबळ यांना ‘कोरोना’ची लागण ! रविवारी सहभागी झाले होते नाशिकमधील शाही विवाह सोहळ्यात

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

भुजबळ यांनी कोरोना चाचणीसाठी स्वॉब दिला होता असे असतानाही त्यांनी रविवारी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. भुजबळ यांनी रविवारी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले होते. या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार, राजकीय नेते सहभागी झाले होते. तसेच रविवारी भुजबळ यांनी साहित्य संमलेनाच्या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती. तसेच सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठकदेखील घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना धसका बसला आहे.

भुजबळ यांनी ट्वीट करुन सांगितले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.