‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं

नाशिक : पोलीनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभेसाठी सोमवारी (दि.21) मतदान झाले. राज्यात सरासरी 60.64 टक्के मतदान झाले. मतदानादिवशी पाऊस पडत असताना देखील अनेक सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान न केल्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहेत. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.

छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असे असतानाही त्यांनी स्वत: मात्र मतदान केले नाही. प्रत्येक निवडणुकीत भुजबळ हे सकाळी लवकर मतदान करून दौऱ्यावर जातात. मात्र यंदा त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. भुजबळ कुटुंबीय नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान करतात.

सिडको येथील ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंब मतदान करते. मात्र, यंदा असे झाले नाही.
छगन भुजबळ यांनी मतदान का केले नाही या बाबत खुलासा केला आहे. येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर जाऊन-येऊन पाच तास म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक सुरु असल्याने मतदारांमध्ये थांबणेही महत्त्वाचे होते. आमचे मतदारसंघ मोठे होते. त्यामुळे मतदानाला जाणे शक्य नव्हते, अशी प्रतिक्रीया भुजबळ यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com