मुंबई: Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) जनसन्मान मेळावा नुकताच बारामतीत पार पडला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे असे शरद पवारांबाबत विधान भुजबळ यांनी केले. (Maratha-OBC Reservation)
“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळ यांनी केलेल्या या आरोपाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली. त्यानंतर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीस गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले.
शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेलेले छगन भुजबळ यांना तब्बल दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीची वेळ मिळाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे.
या भेटीबाबत भुजबळ यांनी सविस्तर खुलासा केला आहे. ते म्हणाले, ” मी कोणतीही अपॉइंटमेंट न घेता आज पवारसाहेबांच्या भेटीसाठी गेलो होतो. तब्बेत बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास तिथे थांबलो. त्यानंतर ते उठले आणि आमची भेट झाली. यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी इथं कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून किंवा आमदार, मंत्री म्हणून आलेलो नाही. पण राज्यात आरक्षणावरून सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आपली भूमिका मांडली पाहिजे, ही विनंती करण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो,” अशी भूमिका राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
पुढे ते म्हणाले, “ओबीसी समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही केले होते. मात्र आता राज्यात काही ठिकाणी तणावाची स्थिती आहे. मराठा समाजाच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये ओबीसी समाजातील लोक जात नाहीत. जिथं ओबीसी समाजातील कोणाचं दुकान असेल तर तिथं मराठा समाजातील लोक जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा,” असं आवाहन मी शरद पवार यांना केले.
त्यावर शरद पवार म्हणाले की, “सरकारच्या लोकांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आलं, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. तसंच लक्ष्मण हाके यांचंही उपोषण कोणत्या आश्वासनावर सोडण्यात आलं, याबाबत आम्हाला कल्पना नाही. मात्र मी पुढील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो,” असा शब्द पवार यांनी आपल्याला दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
तसंच महाराष्ट्रातील सामाजिक तणाव दूर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून यासाठी मी गरज पडल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासही तयार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ambegaon Pune Crime News | पुणे: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आंबेगाव परिसरातील घटना
Swargate Pune Crime News | पुणे: परप्रांतियाकडून कॅब चालकाची फसवणूक, गुन्हा दाखल