भुजबळांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘उशिरा का होईना मदतीला आल्याबद्दल त्यांचे स्वागत’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठवड्याला 2 हजाराने कमी झाल्याचे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. फडणवीस यांच्या प्रयत्नातून नाशिकला आणखी 2 टँकर्स ऑक्सिजनचे मिळणार असतील तर आनंद आहे. सर्वांचे सहकार्य हवे आहे. फडणवीसांनी नाशिक जिल्हा दत्तक घेतला आहे. उशिरा का होईना मदतीला आल्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. फडणवीसांचे दिल्लीत वजन आहे त्यांनी जीएसटीचे पैसे आणावेत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. सिन्नर ऑक्सिजन प्लॅन्टमधून 600 सिलेंडर उत्पादन निर्मिती होत आहे. आम्ही प्रयत्न केले म्हणून ऑक्सिजन ट्रेन आली. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा जिल्ह्यात 10 ठिकाणी आहे. त्यासाठी 10 कोटी मंजूर झाले असून 15 दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. भुजबळ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत याबद्दल मी काय बोलणार. कोरोना लस ही केंद्र सरकार ठरवते त्याप्रमाणे मिळते. केंद्र सरकारने दिल्यानुसार राज्य सरकार वाटप करते. राज्यात लसीचा तुटवडा आहे. लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल, असे ते म्हणाले.