अखेर छगन भुजबळांकडून ‘या’ मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा

येवला (नाशिक ) :  पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र यावर शिवसेना किंवा स्वत: छगन भुजबळ यांच्याकडून मात्र शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. मात्र त्यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर त्यांनी भाष्य केले नाही. येवला येथील  शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणपतीला भेट दिली त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी – शिवसैनिकांचा आग्रह

छगन भुजबळ हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणपतीला भेट देण्यासाठी छगन भुजबळ आले असता शिवसैनिकांनी  ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच त्यांनी शिवसेनेत लवकर प्रवेश करून येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा आग्रह केला. यावर बोलताना भुजबळांनी मी येवल्यातूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचं सांगितलं.

आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे.  राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही  नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र  भुजबळ येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणत्या तिकिटावर तिकीट लढवणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.