मंदिरातून घराकडे निघालेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर जिल्ह्यातील प्रकाश ब्रह्मोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. पीडित मुलींमध्ये 5 वर्षांच्या आणि 11 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या दोन्ही मुली गावातील अन्य मुलीसोबत मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून घराकडे निघाल्यानंतर वाटेत एका तरुणाने तुम्हाला घरी सोडतो, असे सांगून आपल्यासोबत घेऊ गेला. तसेच त्याने आजुबाजूला कोणीच नसल्याचा फायदा घेऊन मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर दोन्ही मुलींनाही गावाच्या बाहेर सोडून तो पसार झाला. घरी आल्यानंतर मुलींनी घडलेला हा सर्वप्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला.