छत्रपती राजाराम मंडळाने साकारली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची प्रतिकृती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे तो सजावटीसाठी, जिवंत देखाव्यांसाठी आणि प्रतिकृतींसाठी. देखावे, प्रतिकृती बनविण्यासाठी गणेश मंडळांमध्ये चढाओढ सुरु असते. गणपती मंडळांचे हे देखावे गणेश भक्तांसाठी पर्वणीच असते.

पुणे शहरात प्रसिद्ध असणारे छत्रपती राजाराम मंडळ या वर्षी 128 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. विविध मंदिरांचे दर्शन घडविणाऱ्या छत्रपती राजाराम मंडळाने यंदा क्षेत्र कोल्हापूर अंबाबाई मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. दरवर्षी रस्त्यावर कोणताही खड्डा न खोदता, वाहतूक कोंडी न करता राजाराम मंडळ गणपती उत्सवाचा पर्यावरण पुरक देखावा साकारत असते.

या वर्षीही त्यांनी ही परंपरा जपली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळातर्फे कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कक्ष तसेच नवजात शिशूंसाठी स्तनपान कक्ष सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिसरातील वाहतूक नियमन सुरळीत रहावे यासाठी 8 सिक्युरिटी गार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय गर्दी नियंत्रणासाठी मंडळातर्फे बाउंसर्स भाविकांना सहकार्य करण्यासाठी ठेवले आहेत.

मागील वर्षी मंडळाने तामिळनाडूतील वेल्होर जवळील थिरुमलाई गावातील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली होती.