‘या’ कारणामुळं खा. छत्रपती संभाजीराजेंचा मराठा समाजाच्या बैठकीत व्यासपीठावर बसण्यास नकार

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा संघटनांच्या विविध बैठका आणि आंदोलनं होत आहेत. आरक्षणाबाबत पुढची दिशा काय असावी यासाठी नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले दोघंही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र उदयनराजे या बैठकीला येऊ शकले नाहीत.

छत्रपती संभाजीराजे यांनी या राज्यस्तरीय बैठकीला हजेरी लावली, परंतु मुख्य व्यासपीठावर बसण्यास संभाजीराजेंनी नकार दिला. यावेळी संभाजीराजे म्हणाले, “छत्रपतींचा आदर, सन्मान राखत आपण या व्यासपीठावर 2 मोठ्या खुर्च्या ठेवल्या, त्याबद्दल आभारी आहे. मी मोठा नाही तर छत्रपतींचं घराणं मोठं आहे. मात्र हा शिष्टाचार ठेवू नये. मी या ठिकाणी येतो तो मराठा समाजाचा सेवक म्हणून ज्या ठिकाणी मानपान ठेवायचा तिथं आम्ही पुढाऱ्यांकडून घेतो, परंतु मी सेवक म्हणून या बैठकीला आलो आहे. त्यामुळं माझीसुद्धा खुर्ची समाजासोबत खाली असावी.” असं ते म्हणाले.

उदयनराजेंनी बैठकीकडे फिरवली पाठ

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईत आज होणाऱ्या मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचं त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितलं. शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी 3 ऑक्टोबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु याही बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.