छत्रपती संभाजीराजेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, पहिल्यांदाच करणार पुण्यात उपोषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदा उपोषणाला बसणार आहेत. तसे त्यांनी जाहीर देखील केले असून हे उपोषण सारथी संस्था वाचवण्यासाठी असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन पुण्यात होणार असून त्याबाबतचे निवेदन देखील त्यांनी दिले आहे.

सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. असे संभाजीराजेंनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले होते. तसेच संभाजीराजेंनी सांगितले की, गेले अनेक दिवसांपासून या प्रकरणात मी लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन देखील माझ्या अध्यक्षतेने करण्यात आले होते. या संदर्भात आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर मार्ग काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते.

संभाजीराजे म्हणाले की, दुसऱ्या दिवशी सारथीच्या कार्यालयात जाऊन दोन्ही बाजूंच्या भूमिका समजून घेतल्या आणि सरकार जोपर्यंत स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी दररोज नवनवीन आदेश काढून संस्थेला बदनाम केले आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली होती की, ते दररोज नवनवीन आदेश काढत आहेत? असा प्रश्न यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय गत्यंतर नाही असे त्यांनी स्पष्ट केले. हे उपोषण ११ जानेवारीपासून सारथी कार्यालयाजवळ करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/