‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल’, शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शिवजन्म सोहळा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबई: शिवजयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. शिवनेरीवर राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केल्यानांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवरायांना वंदन करणासाठी शिवजयंतीची गरज नाही. कारण शिवरायांचे स्थान मनात, हृदयात अखंड आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. शिवरायांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने दुसऱ्यांदा शिवनेरीवर येण्याचा मान मिळाला आहे. वातावरण चांगल असलं तरी, तोंडावर मास्क आहे. कारण आपली लढाई कोरोनाशी सुरु आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं आहे.

छत्रपती दैवत का आहेत,तर त्यांच्याकडे लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर होती. आम्हालाही कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द मिळते आहे. पुरस्कारप्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यभरातून शिवप्रेमी शिवज्योत घेऊन येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली असून काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांसाठी सरकारने नियमावली काढून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमावलीनुसार शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नसल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. त्यातच शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींची जास्त गर्दी होऊ नये म्हणून सरकारने कलम १४४ लागू केलं आहे.