छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणा देणारा – माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घराघरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये साजरी झाली पाहिजे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून बारा मावळ्यांना एकत्र करत स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, असे मत माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

काळेपडळ येथील स्वप्नलोक सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक मारुती तुपे, ज्येष्ठ नागरिक राजेंद्र चव्हाण, रोहिदास महाराज हांडे, दिनानाथ बाविस्कर, श्रीकांत तांबे, श्रीकांत देशपांडे यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, शिवरायांची ओळख सर्वदूर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे काळाच्या क्षणाला आणि प्रत्येकाच्या मनाला एक चेतना देऊन जातात. हीच चेतना पुढे जाऊन व्यक्तिमत्त्व घडवत असते. शिवजयंती साजरी करणं म्हणजे शिवरायांचे विचार देणं हा मुख्य विचार आहे. त्यासाठी स्वप्नलोक सोसायटीमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवव्याख्याते रोहिदास हांडे महाराज म्हणाले की, शिवजयंतीच्या माध्यमातून चिमुकल्या मावळ्यांवर सुसंस्कार होत आहेत. पस्तीस वर्षाच्या कीर्तनामध्ये पहिल्यांदा सोसायटीमध्ये शिवजयंती साजरी होताना पाहत असल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. महेश देशपांडे यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तांबे, अभियंता सोमनाथ जगदाळे व प्रा. दीनानाथ बाविस्कर यांचे मोठे सहकार्य लाभले.