नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये चकमक ; २ नक्षलवादी ठार

दंतेवाडा : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाने कारवाई करून दोन नक्षलींचा खात्मा केला आहे. गोंडेरासच्या जंगलांमध्ये पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत महिला कमांडोंनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.

डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त कारवाई

डीआरजी आणि एसटीएफकडून आज पहाटे छत्तीसगडच्या अरानपुर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये संयुक्त कारवाई सुरु होती. पहाटे ५ च्या सुमारास पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक झाली. त्यावेळी पथकाला तेथे २ नक्षलींचे मृतदेह मिळाले. त्यासोबतच तेथे १ इन्सास रायफल, १२ बोर शस्त्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली.

पहिल्यांदाच महिला कमांडोचा सहभाग

आज पहाटे डीआरजी आणि एसटीएफने केलेल्या या संयुक्त कारवाईत पहिल्यांदाच डिआरजीच्या ‘दंतेश्वरी लडाके’ या महिला कमांडोंनी सहभाग घेतला. या दोन्ही पथकांतील सर्व पोलीस सुरक्षित आहेत. त्यांची कोणतीही हानी झाली नाही. अशी माहिती दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.

असे आहे ‘दंतेश्वरी लडाके’ चे स्वरूप

दंतेश्वरी लडाके हा डिस्ट्रीक्ट रिजर्व फोर्सचा एक भाग आहे. या फोर्समध्ये महिलांचा समावेश आहे. या फोर्समध्ये ३० महिला कमांडोंचा समावेश असतो. समर्पण केलेल्या नक्षली महिला किंवा समर्पण केलेल्या नक्षलींच्या पत्नींचा समावेश आहे.