नक्षलींवर मोठ्या अ‍ॅक्शनची तयारी ! HM अमित शाह यांनी घेतली गृह मंत्रालय आणि CRPF अधिकार्‍यांची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आपला आसाम दौरा रद्द केला आहे. सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्याबाबत शाह यांनी आसामहून परतल्यानंतर दिल्लीत एक मोठी बैठक घेतली. शाह यांनी येथे एमएचए आणि सीआरपीएफच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला स्पेशल डीजी संजय चंदर सुद्धा उपस्थित होते. या मीटिंगमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी अ‍ॅक्शन घेण्याची रणनिती आखली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. सूत्रांनुसार या हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी एनआयएकडे सोपवली जाऊ शकते.

गृहमंत्री अमित शाह रविवारी आसाममध्ये होते. त्यांना येथे रॅली करायच्या होत्या. परंतु बीजापूरच्या घटनेनंतर ते तेथून लवकरच परतले. अगोदर शाह यांना 8 वाजता दिल्लीला परतायचे होते, परंतु बीजापुरमध्ये नक्षली हल्ला झाल्याने ते लवकरच परतले. या बैठकीत गृह सचिव, सीआरपीएफचे अधिकारी, गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि जॉईंट सेक्रेटरी एलडब्ल्यूई सहभागी झाले होते, असे वृत्त आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण ?
छत्तीसगढच्या बीजापुरमध्ये नक्षली कमांडर हिडमा लपला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. ज्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सुरक्षा दलांनी बीजापुर आणि सुकमा बॉर्डरवरील जोनागुडा परिसरात ऑपरेशन सुरू केले. परंतु तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळ्या मारण्यास सुरूवात केली. नक्षलवाद्यांनी तीन प्रकारे सुरक्षा दलांवर हल्ला केला. पहिला बुलेटने, दुसरा टोकदार हत्यारांनी आणि तिसरा देशी रॉकेट लाँचरने. या हल्ल्यात 200 ते 300 नक्षली सहभागी होते. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत. सुमारे 15 नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

छत्तीसगढमध्ये तीन वर्षात 970 नक्षली घटना
2 फेब्रुवारी 2021 ला लोकसभेत नक्षली घटनांबाबत सरकारकडून माहिती मागितली गेली होती. गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यास उत्तर दिले होते. त्यांच्यानुसार, देशात नक्षल प्रभावित परिसरात नक्षली घटना कमी होत आहेत. गृह मंत्रालयानुसार, 2018 मध्ये देशभरात 833 नक्षली घटना नोंदल्या गेल्या होत्या. ज्या 2019 मध्ये कमी होऊन 670 आणि 2020 मध्ये कमी होऊन 665 झाल्या.

मात्र, छत्तीसगढमध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये नक्षली घटना वाढल्या आहेत. लोकसभेत दिलेल्या उत्तरात सरकारने सांगितले की, छत्तीसगढमध्ये 2018 पासून 2020 पर्यंत तीन वर्षात 970 नक्षली घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये सुरक्षा दलांचे 113 जवान शहीद झाले होते. तर, 2019 मध्ये छत्तीगढमध्ये 263 नक्षली घटना नोंदल्या गेल्या, ज्या 2020 मध्ये सुमारे 20% वाढून 315 झाल्या. तर, 2019 मध्ये नक्षली हल्ल्यात छत्तीसगढ मध्ये 22 जवान शहीद झाले होते आणि 2020 मध्ये 36 जवानांनी जीव गमावला होता.